मराठी
मात्रा वेलांटी मुकुट
मायबोलीचा ग थाट
साजे उकार पैंजणी
काना पदराचा काठ
लयदार,वळणाची
अंगी सौष्ठवाचे दान
माथ्यावरी मिरवते
चंद्रकोरीची कमान
गळ्यातूनी उतरता
मुखी नाद ब्रह्म वाजे
धमन्यात अक्षरांच्या
तेज नक्षत्रांचे गाजे
शब्दरत्नांचे घडती
भरजरी अलंकार
सारस्वत लेखणीत
खुलवी सृजनाचे दार
तुझ्या कुळात अलोट
बोलीभाषा सोयरिक
चराचर देते ग्वाही
सारे तुझेच पाईक
संत,साहित्यीक तुझ्या
समृद्धीचे वारकरी
गजरात तुझ्या दंग
लक्ष समुद्र लहरी
धुळपाटीतील धूळ
तोच सौभाग्याचा टिळा
गौरवाचा हा जागर
घुमे अवघ्या आभाळा
तुझ्या दुधाच्या शाईत
माझी व्यक्तता साकार
माझ्या भावनांचा आहे
तूच मूर्त ललकार...
✍🏻समीर देशपांडे✍🏻
तालुका राजापूर,जिल्हा रत्नागिरी
ConversionConversion EmoticonEmoticon