सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 215 दि.16/04/2022

                  छान छान गोष्टी भाग 215

वाचा रे वाचा!






       शनिवार दि.16/04/2022

उंच खिचडी

 दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवुन टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, 'बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा एखादा माणूस शंभर मोहोरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेऊन, रात्र काढील काय रे?'

'कुणी सांगाव ? परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृत्तीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईलसुध्दा.' बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता, उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात, गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची, ही अट तुला मान्य आहे ना ?' त्या गरजू माणसान ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाऱ्यात, त्या तलावातील बर्फ़ागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली.

मग शंभर सुवर्ण मोहोरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता, बादशहानं त्याला विचारलं 'काय रे ? थंडी एवढी जबरदस्त पडली असताना, तू तलावाच्या गार गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस ?'

तो मनुष्य म्हणाला, 'आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळवून, मी गेली रात्र कशीतरी घालवली' त्याच हे विधान ऎकून बादशहाचा हुजऱ्या म्हणाला, ' खाविंद, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला, तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हा टक लावून बघत राहिल्याने, त्याची ऊब याला थोड्याफ़ार प्रमाणात का होईना-मिळाली. म्हणजे याने 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या शंभर सुवर्ण मोहोरा द्यायच्या ?' हुजऱ्याच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला.

मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून, घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला, तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून, बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली; तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, 'खाविंद, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फ़िरलयं ! यमुनेकाठी २० हात उंचीचे तीन खांब अगदी एकमेकांजवळ पूरुन त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीय, आणि खाली जमीनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीय !'

हा अजब प्रकार ऎकून आश्चर्यचकीत झालेला बादशहा स्वत: बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, 'बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतूर असताना, आज तुझ्या डोक्यात हे वेडकसं काय शिरलं ? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का ?'

बिरबल म्हणाला, 'का नाही लागणार ? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते, तर या शेकोटीची धग अवघ्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये ?'

बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात 'प्रकाश' पडला, आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून, त्याला शंभरऎवजी दोनशे सुवर्ण मोहरा दिल्या.

         📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...

▶️आजच्या गोष्टीचे नाव : बुली आणि वाघ

▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक

https://bit.ly/3AkRLEd

 THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »