![]() |
वाचा रे वाचा! |
तेनालीराम आणि स्वप्न महाल
एके रात्री रात्री राजा कृष्णदेवराय याला स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये त्याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्हती जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्हा प्रकाश नको वाटे तेव्हा अंधार होत असे. सुखसंपन्नतेने सजलेला तो महाल म्हणजे एक आश्चर्य होते. पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्या महालाची रचना होती. हे स्वप्नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्यात येतील.
सर्व राज्यात राजाच्या या स्वप्नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्वप्नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावले त्यांना सूचना दिल्या. अंगात विविध कौशल्ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्या डोक्यात आता तो महाल बांधण्याचे ठरलेच होते. काही स्वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्यांनी महाल बांधण्यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्याचे आश्वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत.
कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्याला न रडण्याची विनंती केली व म्हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्हाला न्याय मिळेल याची तुम्ही ,खात्री बाळगा.’’ म्हातारा रडायचे थांबवून राजाला म्हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्हीच सांगा की मी त्यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगा.
’’ म्हातारा म्हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्हातारा म्हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्वप्न पडले, त्या स्वप्नात तुम्ही स्वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्ही तुमच्या राजखजिन्यात जमा करून घेतली.
’’ राजा अजूनच संतापला व म्हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्यात तर काय मी स्वप्नातसुद्धा असा अत्याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्वप्ने कधी सत्य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्या म्हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्हणाला,’’ महाराज अशक्य स्वप्ने सत्यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्हाला सांगायचे होते. माणसाने स्वप्ने सत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे योग्य आहे पण अशक्य असणा-या स्वप्नांच्या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्याने तेनालीरामला चांगला सल्ला दिल्याबद्दल बक्षीस दिले.
तात्पर्य :- योग्य माणसांचा सल्ला काही वेळेला उपयोगी ठरतो, अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : On Duck
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
बदकाचे चित्र काढून रंग द्या तसेच तुम्हाला माहीत असलेले बदकाचे एखादे बालगीत म्हणा व पालकांच्या मदतीने व्हिडीओ करून पाठवा.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
असे कोणकोणते प्राणी व पक्षी आहेत जे अंडी देतात? पालकांच्या मदतीने त्यांची नावे लिहा तसेच तुमच्या आवडत्या पक्ष्याचे चित्र काढून रंग द्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon