_
पन्हाळा किल्ला
हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’ अफजलवधा नंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८ नोव्हेंबर १६५९ ला घेतला. किल्ला विजापुररांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिद्धी जौहरचा वेढा पडला. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
राजवाडा :
हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलेट्री बाईज होस्टेल आहे.
सज्जाकोठी :
राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पहाण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
राजदिंडी :
ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिद्धी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
अंबारखाना :
अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारूगोळा आणि टाकसाळ वैगरे होती.
चार दरवाजा :
हा पूर्वकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स. १८४४ मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्ल्क आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.
सोमाळे तलाव :
गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी :
सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
रेडे महाल :
याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
संभाजी मंदिर :
त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
धर्मकोठी :
संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते. ती धर्मकोठी . सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
अंदरबाव :
तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला मजला रा पेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
महालक्ष्मी मंदिर :
राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
तीन दरवाजा :
हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स. १६७६ मध्ये कोंडाजी फर्जदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
बाजीप्रभुंचा पुतळा :
एस.टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभु देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.
शिवनेरी किल्ला
'जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
प्रतापगड किल्ला
१६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे. प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
*गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :*
त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.
ConversionConversion EmoticonEmoticon