सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Poems कवी कुसुमाग्रज

कविवर्य कुसुमाग्रज 


 कणा
 

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

                                              कवी कुसुमाग्रज

                   अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा

मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव

रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान

सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

                                             कवी – कुसुमाग्रज

                             सागर 

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे

हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती

दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते

देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो

त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी

ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी

नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी

कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे

सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

                                            कवी – कुसुमाग्रज

                  दूर मनोर्‍यात

वादळला हा जीवनसागर – अवसेची रात

पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा

सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली

प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री

वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात

स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी

काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात

अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

– विशाखा, कुसुमाग्रज

                       झाड

एकदा मध्यरात्रीच्या नीरवेतून मी ऐकला होता एक भयानक चीत्कार पलिकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून उफ़ाळलेला. कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या तटस्थ तावदानी काचा, भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे, रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अनकुचीदार झटके फ़ांद्यांतून फ़ुटणार्या अपस्मारांचे. सार्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कोठल्या तरी दानवी अत्याचाराने, आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारूळ पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि शृतिहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे एका फ़ांदीवरुन दुसर्या फ़ांदीवर ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरुन घेतली असेल उशी टाकली असेल झेप उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या त्या पाखराने फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही असेल कदाचित एखादा अजगरी सर्प कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा, असेल काहीही; पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही, पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हालले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत्–शांत! दूर झालो मी खिडकीपासून पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधीरतेने; सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल्या त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन, आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही

– कुसुमाग्रज


              कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!

कवी – कुसुमाग्रज


            स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

कवी – कुसुमाग्रज

    केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही

– कुसुमाग्रज
Previous
Next Post »